शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा ! म्हणाले – ‘ते ‘जाकीट’ कायमचं उतरवलं की हा ‘Lockdown Look’ आहे ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सरकार युद्धपातळीवर त्याविरोधात लाढा देत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याला विरोधी पक्षांनी देखील प्रतिसाद दिला. मात्र, असं असतानाही राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरुच आहेत. युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचं जाकीट कायमचं निघालं की हा फक्त लॉकडाऊन लूक आहे, असं ट्विट त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता केलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना ते अंगावर कायम जाकीट घालत होते. त्यांचा तो पेहेराव ही त्यांची एक ओळख बनली होती. काळी पँट, पांढरा शर्ट आणि त्यावर जाकीट असा कायम त्यांचा पेहेराव असायचा. विरोधी पक्ष नेते झाल्यावरही तो पेहेराव कायम होता. मात्र, लॉकडाऊन नंतर फडणवीस हे जाकीट न घालता दिसू लागले.

घरून व्हिडिओद्वारे दिलेल्या प्रतिक्रिया असोत किंवा राज्यपालांना भेटायला जाणं त्यांनी जाकीट घातलेलं दिसून आलं नाही. हाच धागा पकडून वरुण सरदेसाई यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. बरं ते जॅकेट Permanently उतरवले आहे की हा Lockdown Look आहे ? असं ट्विट त्यांनी केलं आहे. यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.