गडचिरोलीतील शहीद पुत्राच्या आईचा नेत्यांवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानाच्या आईने नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. नक्षलवाद्यांकडे कोठून स्फोटके येतात, नेत्यांकडूनच त्यांना स्फोटके पुरविली जातात असा गंभीर आरोप शहीद झालेल्या दयानंद सहारे यांच्या आईने केला आहे. गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर लखांदूर तालुक्यातील दीघीरी येथे अंत्यसंस्कार झाले. विशेष म्हणजे गुरूवारी दयानंद सहारे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या आईने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

दयानंद सहारे यांच्या आईने आरोप करताना म्हटले, नेतेच नक्षलवाद्यांना भडकवतात, त्यांना दारूगोळा देतात. नक्षलवाद्यांना राजकीय नेतेच स्फोटके पुरवतात. त्यांच्यामुळेच आमच्या मुलांना जीव गमवावा लागतो. दयानंद यांच्या पार्थिवाची वाट बघत असताना त्यांनी प्रसारमाध्यमांना ही खळबजनक प्रतिक्रिया दिली.

दयानंद सहारे हे २०११ मध्ये गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले. ते लहान होते त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांना शिकवले. एवढेच नाही तर दयानंद स्वत: मोलमजुरी करत होते. मोलमजुरी करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते पोलीस दलात रूजू झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, साडेतीन वर्षाची एक मुलगी आणि १२ महिन्यांची मुलगी आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
भंडारा जिह्यातील तीन शूर जवानांना विरमरण आले.

त्यांना एकाच वेळी विरमरण आल्याने संपूर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दयानंद सहारे हे आपल्या कुटुंबातील एकटेच होते. घरातील कर्तासवर्ता मुलगा गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केली आहे.