धक्कादायक ! महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच भोगल्या प्रचंड ‘यातना’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एकीकडे वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसून, मध्यवस्तीतील वाहतूक विभात कर्तव्यास असणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास भयावह अनुभव आला आहे. रुग्णवाहिकेअभावी त्यांना 5 तास त्रास सहन करावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे, नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर देखील त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळे सायंकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत महिला कर्मचाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.

पुणे शहर वाहतूक विभागात महिला पोलिस कर्मचारी कर्तव्यास आहेत. त्या मध्यवस्तीतील वाहतूक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्या कामावर येत नव्हत्या. त्यांना मंगळवारी रात्री खोकला, ताप आणि थंडीचा अधिकच त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्याशेजारी राहणारे आणि वाहतूक विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी खासगी आणि सरकारी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, संबंधित रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यास असर्मथता दर्शविली. त्यानंतर त्यांनी वाहतूक विभागातील वरिष्ठांना फोन करुन रुग्णवाहिकेची तजवीज करण्याची विनंती केली. त्याशिवाय पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

मात्र, चार तासानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागलाच पण आजार जास्त वाढला. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना दुचाकीवर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. अखेर सव्वा बाराच्या सुमारास रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिकेसाठीच पोलिसांवर अशी वेळ येत असल्याने कर्मचारी वर्गाने चिंता व्यक्त केली.

एकीकडे प्रत्येक पोलीस ठाण्यात “सीक” रजेवर तसेच काही आजाराची लक्षणे दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नुकतीच प्रत्येक पोलीस ठाण्यात “पोलीस कल्याण अधिकारी” नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना त्रास होत असल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी तसेच अडचणी सोडविणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना या आपत्कालीन परिस्थितीत सर्वोत्तपरी मदत आणि त्यांची काळजी घेण्याचे प्रयत्न करत असले तरी स्थनिक पातळीवर त्याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे यावरून दिसत आहे.