बिबट्याचा दुचाकीवर हल्ला ; महिला गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पेमगिरी-नांदुरी शिवारालगत घडली.

सुदेशना रावसाहेब खैरनार (वय ४५) हे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पेमगिरी येथील यात्रोत्सवाला सुदेशना खैरनार या मुलगा सूरजबरोबर दुचाकीवर येत होत्या. पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. सुदेशना यांच्या डाव्या पायावर बिबट्याने जोराचा पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली. संगमनेर तालुक्यात अनेकदा बिबट्याचा सामान्य नागरिकांना त्रास होतो.