पट्टेदार वाघाचा वनरक्षकावर हल्ला

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – वाघाने शिकार केलेल्या शेतकर्यांच्या जनावरांचा पंचनामा करायला गेलेल्या वनरक्षकावर पट्टेदार वाघाने हल्ला करण्याची घटना दि.24 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील अर्जुनी गावा लगतच्या जंगलात घडली.

सौदागर लाटकर (वय 40 वर्षे) असे हल्ला झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. बफर क्षेञ मोहर्ली वनपरिक्षेञाअंतर्गत येणार्या अर्जुनी येथील ग्रामस्थ मारोती कुळमेथे यांच्या कडील पाळीव प्राण्याची वाघाने शिकार केली होती. या घटनेच्या पंचनामा करण्याकरीता वनरक्षक सौदागर लाटकर, वनपाल आकाश मल्लेवार आणि अर्जुनी गावातील नागरिक हे अर्जुनी गावालगतच्या जंगलात गेले.

दरम्यान, जंगलातील शिवनी पुल या ठिकाना जवळ पोहचताच बांबुच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने वनरक्षक सौदागर लाटकर यांच्यावर झडप घातली. यावेळी सोबत असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. या हल्ल्यात लाटकर यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन त्यांना चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्यातून लाटकर हे बालबाल बचावले असुन इतर वनकर्मचार्यांमध्ये माञ दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.