Coronavirus : ‘तात्काळ भारत सोडा, अमेरिकेचा नागरिकांना संदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारतात ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा अनेक गोष्टींची कमतरता जाणवत आहे. भारताला अमेरिका, रशिया, जपानसह इतर अनेक देशांनी मदत पाठवली आहे. दरम्यान, देशात रुग्ण वाढत असल्याने देशात रुग्णांना बेड उपलब्ध होणे कठीण झाले असून आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने मायदेशी परतण्यास सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

भारतात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितले आहे. अमेरिकन सरकारकडून यासांबंधी अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी भारतात जाऊ नका किंवा लवकरात लवकर भारत सोडा असे सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सद्या 14 विमान सेवा सुरु आहे. तसेच युरोपमधून जोडली जाणारी सेवा सुरु आहे.

भारतात सध्या कोरोनाचे संकट गंभीर बनले असून अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक झाली आहे. देशात अत्यंत वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे. गुरुवारी 24 तासांमध्ये तब्बल 3 लाख 79 हजार 257 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील चिंता वाढवणारी आहे. देशात 3645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 4 हजार 832 इतकी झाली आहे.