दैव बलवत्तर म्हणून महिल बचावली; अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत

शेवगाव : वृत्तसंस्था

उस तोड करणा-या महिलेवर एका बिबट्याने झडप घातली. त्याचवेळी ही महिला उसाची मोळी घेण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या शेजारी असलेल्या विहीरीत पडला. ही घटना शेगाव तालुक्यातील खामपिंपरी येथे घडली. वनविभागाच्या अधिका-यांना घटना समजता अधिकारी घटनास्थळी आले. आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले.

खामपिंपरी शिवारातील पैठण उजव्या कालव्या नजीक असलेल्या वितरीका क्रमांक पाच नजीक किसन पावसे यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी सुरु आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ऊस तोडणी करणा-या मंगलबाई पवार (रा.लाडजळगाव) यांच्या अंगावर मागील बाजुने आलेल्या बिबट्याने झडप घातली. मात्र याच वेळी ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या जवळच असलेल्या विहिरीत पडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मंगलबाईचा जीव वाचला. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. खामपिंपरीसह नजीकच्या पिंगेवाडी, मुंगी, हातगाव येथील शेतकरी व नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिक, शेतक-यांनी धावपळ करुन बाज पाण्यात सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

ही माहिती वनविभागाला मिळताच शेवगावचे वनपाल सी.ए. रोडे, पाथर्डीचे एम. बी. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी विहिरीतील बिबट्याला बाजाच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.