अभिमानास्पद ! पोलिस दलातील सेवेचा तिन पिढ्यांचा वारसा, संपूर्ण कुटुंबच तिन पिढ्या पोलीस दलात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या व्यवसायातील अनेक कुटुंब आजही पहायला मिळतात. एखाद्या घरामध्ये वडील डॉक्टर असतील तर त्यांचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकिल, एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती सैन्यात असेल तर त्याची पुढची पिढी देखील सैन्यात असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती येथील एक कुटुंब मागिल तिन पिढ्यापासून पोलीस दलाची सेवा करीत आहेत.

करमाळा तालुक्यातील जिती येथील रहिवासी असलेले ओंबासे कुटुंबियांची तिसरी पिढी सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. ओंबासे पिढीतील संदीप, प्रविण आणि सुन सोनाली हे तिघे सोलापूर शहरामध्ये कर्तव्य बजावत आहेत. ओंबासे कुटुंब मुळचे जिंती येथील असले तरी त्यांचे बालपण वंजारवाडी या गावात गेले. ओंबासे कुटुंबातील शंकरराव ओंबासे हे पोलिस दलात सामील होणारे पहिले व्यक्ती. त्यानंतर त्याचा भाऊ यशवंतराव यांनी देखील अगोदर आर्मी आणि नंतर पोलीस दलात हवालदार म्हणून निवृत्त झाले.

यशवंतराव ओंबासे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय आणि कनिष्ठ सुपुत्र संदीप यांनीही पोलीस दलातील सेवेला प्राधान्य दिले. संजय ओंबासे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. तर कनिष्ठ चिरंजीव संदीप ओंबासे हे रेल्वे क्राईम, कल्याण, मुलुंड, दादर, तूर्भे अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करुन आता ते सोलापूर येथे रेल्वे गुप्तचर विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संजय ओंबासे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण पोलीस दलात सामील झाले. ओंबासे यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. दुसऱ्या पिढीपर्यंत ओंबासे कुटुंबातील महिला गृहप्रपंच सांभाळत होत्या. मात्र, तिसऱ्या पिढीतील निलेश ओंबासे यांच्या पत्नी सोनाली ओंबासे या पोलीस दलात कार्यरत आहेत. त्या फौजदार चावडी येथे आपली सेवा बाजावत आहेत. ओंबासे कुटुंबाने नेहमीच पोलीस दलासाठी प्राधान्य दिले. त्यांचा मुलगा रोहित पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पोलीस दलात येऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. असे कुटंब पहायला मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे.