विधान परिषद निवडणूकीत ठरणार महाविकास आघाडीचे ‘भवितव्य’

अकाेला : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचही जागांवर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi ) आणि भाजप ( BJP) यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद पणाला लागणार आहे. भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकाेनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याचीच (legislative-council-elections-will-decide-future-mahavikas-aghadi) चिन्हे आहेत.

राज्यातील नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत, तर या पाच मतदारसंघांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे व औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी, तर नागपूरची जागा काँग्रेस लढवत आहे.

शिक्षक मतदारसंघात पुण्याची काँग्रेस व अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिला आहे. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक व पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी, भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आला आहे.

या दाेन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजप विराेधात महाविकास आघाडी, अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय-पराजय हा भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे.

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला, तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद अजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे.

भाजपात सबकुछ फडणवीस
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्ये फडणवीस यांचे स्थान अधिकच बळकट झाले आहे. विशेषत: नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ठरविताना फडणवीस यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य यामुळे पक्षात त्यांचा शब्द अंतिम हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.