शिरूर मध्ये बिबट्या जेरबंद

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील कुरुळी येथील विठ्ठल बोरकर यांच्या शेतात पाणी देणाऱ्या कामगाराला सकाळी 8 वाजता 3 वर्षे वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचा पाय कशातरी अडकला असल्याचे दिसले. यावेळी येथील सुनिल खांडेकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहीती दिली.

परिसरात बिबट्या असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी धाव घेतली. वनविभागाचे अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पथकाला तत्काळ पाचारण केले .बिबट्याच्या जवळ जाताना तो मोठ्या डरकाळ्या फोडत होता. यावेळी डॉ. निखिल बनगर, वन्य जीव पशुवैद्यक यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन शुट केले. त्या नंतर तब्बल 20 मिनीटांचा वेळ जाऊ देत बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला उचलून नेत जाळीत सोडण्यात आले.

अडकलेल्या बिबट्याला तब्बल तीन तासांच्या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेशुद्ध करून सुरक्षितरित्या ताब्यात घेतले.यावेळी पकडलेल्या बिबट्याचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सुनिल खांडेकर, आबासाहेब देशमुख यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष सहकार्य केले. वन्य जीव पशुवैद्यक डॉ. निखिल बनगर, पशुवैद्यकीय सहाय्यक महेंद्र ढोरे, आकाश डोळस, वैभव नेहरकर, वन परिक्षेञ अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल प्रविण क्षिरसागर, वनरक्षक संजय पावणे, संतोष जराड, विशाल चव्हाण, बबन दहातोंडे, नवनाथ गांधले, गोविंद शेलार, सुधीर शितोळे, अभिजित सातपुते आदी या रेस्क्यु मोहीमेत सहभागी झाले होते.

सदर बिबट्यावर शिरुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथे निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेञ अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.