माॅलमध्ये शिरला बिबट्या ; परिसरात खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – खेड्यांमधील वस्त्यांवर बिबट्याचे मानवी हल्ले होणे ही बाब काही नवी नाही. मात्र आता शहरांमधील भर वस्तीत देखील बिबट्याचा वावर असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात बिबट्याने प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मध्यरात्री बिबट्याने कॅडबरी कंपनीत प्रवेश करताना काहीजणांनी पाहिले. यानंतर बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या परिसरातील पार्किंगमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले. मात्र मॉलच्या संरक्षक भिंतींवरून पहाटे ५. २९ वाजता बिबट्या बाहेर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यापुढे हा बिबट्या ठाण्यातील वसंत विहार परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बिबट्याचा शोध सुरू असून त्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे.

हेही वाचा – पंतप्रधानांना पुलवामापेक्षा जाहीरसभा महत्वाची : शरद पवार 

दरम्यान मॉलमध्ये बिबट्या शिरल्याचे कळताच अग्निशामक दलाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून विनविभागामार्फत संपूर्ण मॉलची पाहणी करण्यात येत आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर मध्यरात्री पार्किंगमध्ये शिरलेला बिबट्या पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी मॉलची संरक्षक भिंत ओलांडून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या वसंत विहार या वस्तीच्या ठिकाणी गेल्याचे समजताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन रक्ष आणि वन अधिकारी तातडीने वसंत विहार परिसरात पोहोचले. सध्या बिबट्याला शोधण्याचे काम सुरू आहे.
बिबट्याने दरम्यानच्या काळात कुणाला इजा केली आहे का याचाही शोध घेतला जात आहे. बिबट्या पुन्हा येऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत विचार सुरू असून त्यासाठी संपूर्ण मॉलसह आसपासच्या परिसराचीही पाहणी करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वा येऊर परिसरातून हा बिबट्या ठाणे शहरात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.