कोलवडीत झाले बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – कोलवडी (ता. हवेली) येथील मुळा मुठा नदीच्या काठावर शितोळेवस्ती येथे आज बिबट्या दिसल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्व हवेलीतील मुळा मुठा नदीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याची चर्चा होती. मांजरी परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यानंतर वन विभागाने या परिसरावर लक्ष ठेवून होते. आज शुक्रवार रोजी कोलवडी येथील शितोळेवस्ती परिसरात आनंदा गायकवाड यांच्या शेतात ऊसाला पाणी देत असताना त्यांचा शेतमजूर यास एक बिबट्या त्याच्या शेजारील ऊसात दिसला ते घाबरुन जोरात आरडाओरडा केला, तेव्हा शेजारी असणारे इतर तेथे धाऊन गेले. परंतु आजुबाजुला सर्व उंच ऊसाचे क्षेत्र असल्याने कोणाचीही आत घुसण्याची हिंमत झाली नाही.

यावर वन विभागाला याची कल्पना देण्यात आली. यावर या परिसराचे वन रक्षक बळीराम वायकर तसेच वन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पहाणी करुन तेथे एक पिंजरा बसवण्याचे ठरविले.

पूर्व हवेलीत या पूर्वी आळंदी म्हातोबा मांजरी त्यानंतर कोलवडीत दिसल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे. विजेची उपलब्धता रात्री अपरात्री होत असल्याने शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागते. आता नेमके काय करावे असा प्रश्न या शेतकर्यांकडे पडला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/