एकाच परिसरात बिबट्याने घेतले ६ बळी 

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एक महिन्यापासून वरोरा तालुक्यातील अर्जुनी परिसरात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा या बिबट्याने शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. निर्मला बबन श्रीरामे (४८) असे या महिलेचे नाव आहे. या परिसरात आतापर्यंत नरभक्षक बिबट्याने सहा बळी घेतले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अवनी वाघीणीला ठार केल्यानंतर प्राणीप्रेमींनी केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात गोंधळ घालत अश्रु ढाळले होते. मात्र, बिबट्याने या ठिकाणी सहा बळी घेतल्यानंतरही कुणाला अद्याप वाईट वाटलेले नाही, ही शोकांतिका आहे.

वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे निर्मला बबन श्रीरामे ही शेतमजूर महिला कापूस वेचण्यासाठी गेली होती. काम सुरू करण्यापूर्वी सर्व शेतमजूर महिलांनी, शेतमालक व त्याच्या मुलाने परिसरात वाघ किंवा बिबट नसल्याची खात्री करून घेतली आणि नंतर कापूस वेचणीला सुरुवात केली. दुपारीच्या सुमारास निर्मला श्रीरामे हिने वेचलेला कापूस गाठोड्यात जमा करण्यासाठी म्हणून इतर महिला मजुरांपासून काही अंतर दूर गेली होती. त्याचवेळी ती महिला एकटी असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून इतर मजूर महिला व शेतमालक घटनास्थळी धावले. तेव्हा त्या महिलेला सोडून बिबट्याने पळ काढला; परंतु तोपर्यंत निर्मला श्रीरामे यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच ताडोबाच्या बफर क्षेत्राचे उपवनसंरक्षक नरवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, शेगावचे ठाणेदार कृष्णा तिवारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. तोपर्यंत अर्जुनीसह परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रामदेगी, अर्जुनी परिसरात माणसांवर हल्ले करणारा एकच बिबट असून निर्मला श्रीरामेच्या रूपाने बिबट्याने हा सहावा बळी घेतल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.