संगमनेर : भरधाव वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन –   अज्ञात वाहनाच्या धकडेने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील निमज गावच्या शिवारात रविवारी ( दि. 20) पहाटे ही घटना घडल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वाहनांच्या धडकेमुळे रात्रीच्या वेळी बिबटे मृत्यूमुखी पडण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर वनविभागाचे वनरक्षक सी.डी. कासार यांना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास समजली. वनपाल एस.आर.पाटोळे, वनकर्मचारी अरुण यादव, अण्णा हजारे यांच्यासह वनरक्षक कासार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निमज गावच्या शिवारातील खंडोबा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याच्या तोंडाला गंभीर मार लागला होता. हा बिबट्या नर जातीचा असून तो दीड वर्ष वयाच्या असल्याचे कासार यांनी सांगितले. पंचनामा केला असून बिबट्याचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले आहेत.