अंबाजोगाई पोलिसांसमोर बिबट्याची परेड…

अंबाजोगाई  : पोलीसनामा आॅनलाइन – गुन्ह्याच्या तपासाहून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस येत असताना येल्डा परिसरात त्यांच्या वाहनासमोरून बिबट्याने मोठ्या थाटात परेड केली. त्यानंतर वाण नदीतून शेजारच्या माळावर हा बिबट्या निघून गेला. हा प्रसंग पोलीसांना शुक्रवारी रात्री अनुभवास आला.

अनेक वर्षापासून अंबाजोगाई भोवतालच्या परिसरात अधूनमधून बिबट्याचा वावर असल्याचे ऐकावयास मिळते. आतापर्यंत अनेक जनावरांचा बळी बिबट्याने घेतलेला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात येल्डा परिसरातील काही शेतकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर थेट मागील आठवड्यात बुट्टेनाथ परिसरात बिबट्या पुन्हा अवतरला आणि दोन वासरांचा फडशा पाडला आणि गायब झाला.

शुक्रवारी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दामोदर  वाघमारे आणि कर्मचारी डोंगरे हे गडदेवाडी येथील तपास आटोपून परत येत असताना येल्डा परिसरात सायंकाळी ७.४५ वाजता त्यांच्या गाडीसमोर बिबट्या आडवा आला. बिबट्या दिसल्याने पोलिसांनी गाडी थांबविली. तेंव्हा पोलिसांच्या वाहनासमोरून बिबट्या मोठ्या डौलात चालत वाण नदीकडे गेला आणि तिथून वरच्या माळरानात निघून गेला. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ याबाबत वनविभागास सूचित केले आहे.

दरम्यान, बिबट्याची उपस्थिती म्हणजे अंबाजोगाई परिसरातील वनसंपदा वाढल्याचे शुभलक्षण असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला. सहसा बिबट्याचा वावर वनसंपदा आणि तृणभक्षी प्राणी असलेल्या क्षेत्रात असतो. अंबाजोगाईच्या आजूबाजूला विपुल वनसंपदा तर आहेच, परंतु हरिण, रानडुक्कर अश्या शेतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांचीही प्रचंड संख्या आहे. हेच प्राणी बिबट्याचे प्रमुख भक्ष्य आहे. बिबट्याच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे शत्रू असलेल्या हरीण, रानडुकरांच्या त्रासापासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा वनाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बिबट्या आल्यामुळे घाबरून जाऊ नये. बिबट्या सहसा मनुष्यप्राण्यावर हल्ला करत नाही, त्यामुळे त्याचा पाठलाग करू नका अथवा त्याला छेडू नका असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. जर एखाद्यावेळेस बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याचीही योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

नागरिकांनी काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन 

“बिबट्या स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही, त्यामुळे विनाकारण त्याला छेडू नये. तरीसुद्धा नागरिकांनी  सध्यातरी या भागात फिरताना एकटे फिरू नये. बिबट्या दिसून आल्यास तत्काळ वनविभागास कळवावे.”
– शंकर वरवडे, वन परिमंडळ अधिकारी