भद्रावती शहरात बिबट्याची दहशत कायम !

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन महिन्यापासून भद्रावती शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला असुन नागरिकात दहशत निर्माण केली असुन वनविभागाने लावलेल्या पिंजर्याला हुलकावणी देत आहे. येथील आयुध निर्मानीचा परिसर हा वनव्याप्त परिसर असुन या परिसराला लागून ताडोबाचे जंगल आहे. या जंगलातून बिबट्या आणि पट्टेदार वाघ आयुध निर्मानीच्या जंगल परिसरात येतात व तेथुन भद्रावती शहरात प्रवेश करतात बिबट्यांचा हा धुमाकूळ मागिल दोन महिन्यापासून सुरू असुन या बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला अजुनही यश आलेले नाही.

भद्रावती शहरातील गौतम नगर, छञपती लेआऊट, आयुध निर्माणी चेकपोष्ट, मल्लारीबाबा सोसायटी, कटारिया लेआऊट, पावररग्रीड, तहसील ऑफीस, पोलिस स्टेशन, इत्यादी परिसरात त्याचा वावर असतो. नुकताच काही दिवसांपूर्वी एक बिबट चक्क पोलिस स्टेशन चा दारा जवळ येवून गेला कधी एक तर कधी दोन कधी तीन अशा संख्येत हे बिबट शहरात शिरतात या बाबत नागरिकांनी वनविभागकडे तक्रारी केल्या असता जवळपास पंधरा दिवसापासून वनविभागाने पिंजरा लावण्याची मोहिम हाती घेतली परंतु बिबट्या माञ अजुनही या पिंजर्यांना हुलकावणी देत आहे. सद्ध्या गौतम नगर, तहसिल कार्यालय आणि रामटेके सोसायटी या परिसरात वनविभागाने पिंजरे लावले आहे.

अगदी अलीकडेच दि. 22 सप्टेंबर रोजी राञी अडिच वाजता गौतम नगरातील रोहित गजभिये यांचा घरी बिबट्याने दस्तक दिली तर, दि.23 सप्टेंबर रोजी राञी आठ वाजता याच नगरातील प्रशांत शिवनितवार यांच्या घरात प्रवेश करून बिबट्याने आपली दहशत निर्माण केली. या वेळी नागरीक फिरत असतांना बिबट्या दिसल्याने त्याने आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. नागरिकांच्या घरात असलेले कुञा, बकरी, गाय, कोंबडे इत्यादी पाळीव प्राण्यांची शिकार करण्या करिता शहरात प्रवेश करित असुन आजूबाजूच्या परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.