नाशिकमध्ये बिबट्याचा थरार ! इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसासटीत दोघांवर हल्ला

नाशिक : इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीत बिबट्याने प्रवेश करीत दोघांवर हल्ला करुन जखमी केले. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याचा सुमारास घडली. वन विभागाचे रिस्की पथक व इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत़ परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच रहिवाशांमध्ये घाबरट पसरली असून त्यांनी आपली दारे खिडक्या बंद करुन घेतल्या आहेत.

सर्व प्रथम पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील एका रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास बिबट्या पळताना दिसला होता. त्यानंतर राजसारथी सोसायटीमधील १२ विंगमध्ये बिबट्या सर्वप्रथम शिरला.

येथे जिन्यामध्ये बिबट्याने सुपडू लक्ष्मण आहेर या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला. त्यात आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या जिन्याने खाली आला आणि सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरुन तो पुढे गेला. त्याचवेळी रस्त्यावरुन एक जण फिरायला जात असताना त्यांच्यावर त्याने हल्ला केला. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर बिबट्या सोसायटीच्या मागील बाजूने झेप घेत वाडाळ्याच्या दिशेने नाल्याकडे धुम ठोकली असावी, असा अंदाज आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या आहेत. या बिबट्याने काल एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर हल्ला केला होता. दिवसभर शोध घेतल्यानंतरही तो सापडू शकला नव्हता. आज वन विभाग व पोलीस त्याचा शोध घेत आहेत.