काय सांगता ! होय, भाडेकरूच्या पत्नीसह घरमालक पत्नीचे ‘समलैंगिक’ संबंध, कायम ठेवण्यासाठी पतीचा खून

अलीगड : वृत्तसंस्था – समलैंगिक संबंधास नकार दिल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला आहे. भाडेकरूच्या पत्नीसोबत समलैंगिक संबंध कायम राखता यावेत या कारणावरून घरमालक पत्नीने आपल्या पतीचा खून केला. घरमालकाचा खून करण्याचा कट घरमालकाची पत्नी आणि भाडेकरुची पत्नी या दोघींनी मिळून रचला होता.

भूरीसिंह गोस्वामी (रा. कुंवरनगर, गांधी पार्क, अलिगड) असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे. गोस्वामी याचा मृतदेह होळीच्या रात्री परिसरातील एका नाल्यात आढळून आला होता. मृतदेहाचे हातपाय बांधून त्याच गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. होळीच्या दिवशी आपले पती पैसे वसूल करण्यासाठी गेले होते, मात्र ते परत आलेच नाहीत अशी माहिती गोस्वामी याच्या पत्नीने पोलिसांना दिली होती.

भाडेकरुच्या पत्नीसोबत समलैंगिक संबंध
गोस्वामी याचा खून झाल्यानंतर त्याच्या भावाने होळीच्या दुसऱ्या दिवशी अलीगड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीत त्याने भावाचा खून त्याची पत्नी आणि भाडेकरूची पत्नी या दोघींनी मिळून केला असल्याचा आरोप केला. त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून त्या अनुषंगाने तपास सुरु केला. पोलिसांनी दोघींकडे केलेल्या चौकशी नंतर पोलिसांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बदला. भूरीसिंह गोस्वामी याची पत्नी रूबी आणि भाडेकरूची पत्नी यांच्यामध्ये समलैंगिक संबंध होते.

एक महिन्यात आखली योजना भूरिसिंह याला आपल्या पत्नीचे आणि भाडेकरुच्या पत्नीचे समलैंगिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्याने या संबंधाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भूरिसिंह याला आपल्या वाटेतून दूर करण्याचा कट दोघींनी आखला. एक महिन्यापासून या दोघी भूरिसिंहचा काटा काढण्याचा कट आखत होत्या.

असा केला खून
होळीच्या दिवशी गोस्वामी यांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह भावाच्या घराबाहेर फेकून देण्यात आला. गोस्वामी याचा मृतदेह भावाच्या घराजवळ सापडल्याने त्यांच्या खूनाचा संशय भावावर जाईल हा त्या मागचा मुख्य उद्देश होता. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून खून करण्यासाठी वापरण्यात आलेली रस्सी आणि टेप जप्त करण्यात आला आहे.