खासगी ट्रॅव्हल्सनाही पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीची परवानगी !

मुंबई  पोलीसनामा ऑनलाईनः – कोरोनामुळे संकटांत सापडलेली लालपरी अर्थात एसटी बस 18 सप्टेंबरपासून पूर्ण आसन क्षमतेने धावत आहे. लालपरीला पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली. मात्र, खासगी बस वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडूनही संपूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्याची मागणी होत होती. अखेर राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीलाही (private-buses-are-allowed-carry-passengers-full-capacity) हिरवा कंदील दर्शवला आहे.

राज्यात सर्व खासगी बसमधून 100 टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतानाच परिवहन आयुक्तालयाकडून खासगी बससाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करणे बस वाहतूकदारांना बंधनकारक आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देवू नये, बसमध्ये अतिरिक्त मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी, बस निर्जंतुक करण्याची जबाबदारी बस मालकाची असेल, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. दरम्यान कर्नाटक आणि गुजरात राज्यात 100 टक्के प्रवाशी वाहतूक सुरू केल्यानंतर आता एसटीला पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तर, उद्यापासून खासगी ट्रॅव्हल्स एजन्सींनाही पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाशांना हे बंधनकारक –
बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईझर वापरणे बंधनकारक आहे.
वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करून मार्गस्थ कराव्यात.
कोरोना वाहतूक नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.