Pune Gram Panchayat Elections : होऊ दे खर्च ! आपणच होणार सरपंच असे म्हणत निवडणुकीत उमेदवारांचा पैशाचा धुराळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार 15 हजार ते 75 हजार रुपये खर्चास परवानगी दिली आहे. हा खर्च आयोगाला सादर करायचा असतो. तरीही आयोगाने दिलेल्या खर्च मर्यादा पुणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत चांदीच्या वस्तु, एक महिन्याचा किराणा, साड्यासह थेट मताला हजारो रुपये वाटप करत पैशांचा अक्षरश : धुराळा उडवल्याचे दिसून आले आहे. यात शिरुर, हवेली, खेड आणि मावळ, मुळशी तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील व मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा निवडणूक खर्च तर कोटीच्या घरात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान सरपंचपदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे कदाचित आरक्षण सोडतमध्ये सरपंचपदासाठी आपलाच नंबर लागेल या आशेवर अनेकांनी कोट्यवधीची उधळपट्टी केल्याचे बोलले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (दि.15) रोजी मतदान झाले. यात हवेली, खेड, शिरूर आणि मावळ, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांचा खर्च तर 1 ते 5 कोटींच्या घरात गेला आहे. खेड तालुक्यातील एका ग्रामपंचायत उमेदवाराने आपले निवडणूक चिन्ह असलेल्या बॅटच्या चांदीच्या प्रतिकृतीचे वाटप केले. जुन्नर तालुक्यात काही सदस्यांनी एक महिन्याचा किराणा, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, विविध प्रकारची वाणांचे वाटप केले आहे.

निवडणुका जाहीर झाल्या पासून उमेदवारांकडून मोठ्याप्रमाणात मिष्टान्न व मासांहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या. तर मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप केले आहेत. या एका मतासाठी पाचशे रुपयांपासून एक, दोन, तीन हजारसह थेट 20,25 हजार रुपयांचे देखील वाटप केल्याच्या जोरात सुरू आहेत. तसेच मुंबई, पुण्यातील मतदारांना गावाला घेऊन येणे आणि पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोय केली होती.

शिरूरमध्ये मताला 80 हजार
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एका ग्रामपंचायती उमेदवारांने तब्बल 80 हजार वाटप केल्याची जोरदार चर्चा गावांच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर एमआयडीसीतील एकाही ग्रामपंचायतीत मताला 20-25 हजारापर्यंत देखील वाटप झाल्याचे खात्रीच्या सुत्रांनी दिली.