Lockdown बाबतचा निर्णय तज्ज्ञांना घेऊ द्यावा ! तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी आवश्यक – खा. वंदना चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   तज्ज्ञांनी दिलेल्या इशार्‍यानुसार, आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी हा वेग अतिशय कमी आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा अतिशय धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत पुण्याच्या महापौरांची ‘लॉकडाऊनची अजिबात गरज नाही,’ ही भूमिका भविष्यातील भीषण संकटाला आमंत्रण देणारी ठरू शकते. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचं मत विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

गेल्या काही दिवसांपासून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयही कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

पुणे हे देशातील सर्वात बाधित शहर’ असल्याचे वृत्त माध्यमांतून येत आहे. त्यामुळेच पुण्यातील रुग्णांना गरज असेल तर मुंबईत हलवता येईल, अशी भूमिका कालच उच्च न्यायालयाने मांडली. यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल, मात्र न्यायालयात सादर केलेली आकडेवारी जुनी आहे, असे महापौर म्हणत असतील तर त्यांनी अद्ययावत आकडेवारी जरूर द्यावी, पण कोरोनाला तोंड देत असताना रुग्णांचा जीव महत्त्वाचा असल्याने याबाबत कोणतीही तडजोड करणं योग्य ठरणार नाही.

‘पुणे शहरात लॉकडाउनची अजिबात गरज नाही’ अशी भूमिका महापौरांनी घेतली, पण त्याला आधार काय याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. सध्या राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत आणि त्याचा थोड्या-फार प्रमाणात काहीजणांना त्रास होऊ शकतो, याची सर्वांनाच कल्पना आहे. पण म्हणून संपूर्ण शहराचं आरोग्य धोक्यात घालायचे, हे योग्य नाही. पुण्यातील रुग्णसंख्येचा आलेख अत्यंत मंदगतीने उतरत आहे. आजही पुणेकरांना बेडसाठी शोधाशोध करावी लागत आहे. हॉस्पिटलचे भरमसाठ बिल भरता न आल्यामुळे 30 तास मृतदेह नातेवाईकांना मिळत नाही, अशा घटना घडत आहेत. कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्यांचे घरातच विलगीकरण योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर आता कागदावरच उरले आहे. रेमडेसिवीर, टॉसिलोझूमब यांसारख्या औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण थांबलेली नाही. लसीकरणाचा उडालेला बोजवारा पुणेकर रोजच अनुभवत आहेत.

अत्यंत अनुभवी असलेले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनीही लॉकडाऊन संदर्भातील निर्णय हा मुख्यमंत्र्यांवर सोपवला आहे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय तज्ज्ञांच्या ‘टास्क फोर्स’शी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेत नाहीत, हे योग्यच आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांचा उदरनिर्वाह चालू ठेवणे आणि संसर्ग रोखणे यामध्ये मेळ घालण्याची अतिशय अवघड भूमिका पालकमंत्री या नात्याने अजितदादा पार पाडत आहेत. उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अर्थकारणावर परिणाम होणार हे साहजिकच आहे, मात्र, सध्या एक-एक जीव वाचवणे, हीच प्राथमिकता असायला हवी. त्यासाठी तज्ज्ञांनी कठोर निर्णय घेण्याची शिफारस केली तरी तो आपल्याच हितासाठी आहे, ही मानसिकता पुणेकरांनीही लक्षात घेण्याची गरज आहे.

बेसावध राहून चालणार नाही !

कोरोनाच्या संसर्गावर आम्ही भारतीयांनी यशस्वीरीत्या मात केली, या अविर्भावात केंद्र सरकार पूर्णपणे निष्काळजी झाले आणि जगभर आलेली दुसरी लाट जणू आपल्यापर्यंत पोचणारच नाही, असेच चित्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उभे झाले. आता आलेला कोरोनाचा दुसरा स्ट्रेन सर्व कुटुंबाला ग्रासतोय. युवकांवर त्याचा गंभीर परिणाम होतोय, आणि लहान मुलांमध्ये तर याचे प्रमाण मोठे आहे. आधीच खूप पुणेकरांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. त्यामुळे आता बेसावध राहून चालणार नाही.