‘नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासाठी कडक कायदा करू’ : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य देणे आवश्यक असून यासाठी गरज पडल्यास कडक कायदा करण्याचे प्रस्ताव आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागरपुरातील मिहान परिसरात असणाऱ्या आयआयएमच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. इतकेच नाही तर, मिहानमध्येदेखील स्थानिक भूमिपुत्रांनाच राेजगार देण्यासाठी प्राधान्य दिले जावे असेही गडकरी म्हणाले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, “आगामी काही वर्षांमध्ये मुंबईजवळील जेएनपीटीमध्ये विविध विकास कामांसाठी कमीत कमी सव्वा लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या नोकऱ्यांमध्ये कमीत कमी 80 टक्के नोकऱ्या या स्थानिक भूमिपुत्रांना देण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत” असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “जागतिक दर्जाचे आयआयएम नागपूर येथे साकारले जाणार आहे. लाॅजिस्टिक संदर्भातील अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांचाही यामध्ये प्राधान्याने समावेश असावा. आयआयएम आणि मिहानच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना राेजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. नागपूर आता लॉजिस्टिक व कार्गोहब बनत आहे. रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अनेक पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे होत आहेत” असेही गडकरी यांनी सांगितले आहे.

सरकारी आर्किटेक्ट आणि सांबाविच्या कामाची खिल्ली उडवली

यावेळी बोलताना गडकरींनी सरकारी आर्किटेक्ट आणि सांबाविच्या कामाची खिल्ली उडवली. गडकरी म्हणाले की, “आयआयएमच्या नव्या इमारतीचे डिझाईन तयार करण्याचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टला दिल्यामुळे आयआयएमची नवी इमारत सुंदर असणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा सरकारी आर्किटेक्टला हे काम दिले असते तर त्यांनी डब्यासारखी इमारत बांधली असती.” असे गडकरी म्हणाले.