…तर धनंजय मुंडेंवर कारवाईची जबाबदारी आमची : शरद पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. याप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊन सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची राहिल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केलंय.

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौर्‍यावर आहेत. बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारले. असता त्यावर शरद पवार म्हणाले, ’काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलाय. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊन सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’

दरम्यान, गोवा शिपयार्ड, कारवार इथल्या नौदलाचा सी बर्ड तळ तसेच तटरक्षक दलाच्या आस्थापनांना भेट देऊन संसदीय समितीने तेथील सज्जतेचा आढावा घेतला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यालयाला धावती भेट दिली. केंद्र सरकारने जी शेतकरीविरोधी विधेयके संमत केलेली आहेत, त्याचाही शरद पवार यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमांव आणि अन्य पदाधिकारी आदी उपस्थित होते.