दिक्षाभूमी, चैत्यभूमी प्रमाणे शौर्यदिन साजरा करुया : सर्जेराव वाघमारे

शिक्रापूर -एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा,पेरणे फाटा विजय रणस्तंभ या ठिकाणी होणारा विजय रणस्तंभ अभिवादन कार्यक्रम घरूनच अभिवादन करून साजरा करावा असे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा ,पेरणे फाटा येथे दर वर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जात असताना महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून लाखो भीम अनुयायी येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात, मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता शासनाच्या वतीने सर्वच सन उत्सव व आदी कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले असून सर्वच कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरुपात साजरे केलेले आहेत, त्याप्रमाणे यावर्षीचा एक जानेवारी २०२१ रोजी विजयस्तंभ येथे साजरा करण्यात येणारा शौर्यदिन कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, कोरेगाव भीमा विजयस्तंभ समितीच्या माध्यमातून प्रतीकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे, ज्या प्रमाणे दिक्षाभूमी, चैत्यभूमी येथे प्रशासनाला सहकार्य करत सर्व कार्यक्रम व उत्सव साधे प्रमाणे साजरे करण्यात आले त्या प्रमाणे येथे देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे अहवान कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये तीन लाखाहून अधिक रुग्ण कोरोना बाधित झाले असून सात हजार रुग्ण मयत झाले तर सध्या सतरा हजार रुग्ण कोरोना बाधित आहेत त्यामुळे विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच एक जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून घरूनच नागरिकांनी अभिवादन करावे त्या पद्धतीची सुविधा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे देखील सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले आहे.