‘आमच्या वैमानिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पाकिस्तानने आज सकाळी भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने त्याला चोख उत्तर दिले. परंतु यावेळी भारताचा एक पायलट बेपत्ता झाला. यानंतर सदर पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडीओ ही समोर आला आहे. पाकिस्तानने तसे ट्विटही केले होते. यानंतर आता भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये असे म्हणत भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

दहशतवादाविरोधात पाऊल उचलत भारताने जैशच्या अड्डयावर हल्ला करत त्यांचे अड्डे नष्ट करत तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर मात्र आज (बुधवार) भारताच्या लष्करी ठाण्यांना पाकिस्तानने लक्ष्य केले. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पंरतु सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष असल्याने हा हल्ला निष्फळ ठरला. असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक विमान पाडले; पण याच कारवाईत आपलेही एक विमान पडले आणि त्यातील वैमानिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिकाला सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आता दबाव टाकला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, अशा स्पष्ट शब्दात भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आले होते.

भारतीय विमान कोसळल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी स्वतःची सुटका करून घेतली. परंतु, ते पाकिस्तानच्या नागरिकांच्या तावडीत सापडले. यानंतर पाकिस्तानच्या नागिरकांनी त्यांना मारहाण सुरू केली. यानंतर अभिनंदन यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत होता. शिवाय त्यांचे हात आणि पाय बांधलेले होते आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती.

पाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या तावडीतून वाचविल्याचे म्हटले आहे. यामध्ये ते चहा पित असताना पाकिस्तानी सैनिकांशी बोलत असल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानचे सैनिक अभिनंदन यांना नाव-गाव-पत्ता विचारत आहेत. त्यावर बोलताना अभिनंदन केवळ नाव सांगत आपण दक्षिण भारतीय असल्याचे सांगत आहे. पुढे बोलताना, ‘मला खात्री आहे बाकी तुम्ही शोधून काढालंच…’ असे म्हणत ‘सॉरी मेजर मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकत नाही’ असे अभिनंदन यांनी म्हटले आहे.