2024 मध्ये भारताला देखील असाच एक जो बायडन मिळावा, हीच आशा करूया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेतील राष्टाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय संपादन करत 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पराभवाने मात्र अमेरिकेत तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सलग दुसऱ्यांदा लोकांनी पॉप्युलर वोटमध्ये पराभूत केले आहे. बायडन यांच्या विजयाचे भारतातही अनेक ठिकाणी सेलिब्रेशन होतान दिसत आहे. तर, अमेरिकेप्रमाणे भारतातही अशाच बदलाची गरज असल्याचे भाजपाविरोधी नेतेमंडळी आणि नेटीझन्सकडून सांगण्यात येत आहे.

चुरशीच्या निवडणुकीत मतमोजणीच्या वादानंतर अखेर जो बायडन यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. बायडन यांच्या विजयाचा आनंद भारतीयांनाही झाला आहे. भारतातील सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात बायडन यांचे फोटो व्हायरल झाले असून त्यांचे आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांचे अभिनंदन होत आहे. काँग्रेस नेत्यांकडूनही बायडन यांच्या विजयानंतर अभिनंदन होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही बायडन यांचे अभिनंदन केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत भारत आणि अमेरिकेतील संबंधात अधिक दृढता येईल, असेही म्हटले आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी ट्विट करुन तशी अपेक्षाच व्यक्त केली आहे. भारतातही अशाच एका जो बायडनी गरज आहे. सन 2024 मध्ये भारतालाही असाच एक नेता मिळेल, अशी आशा करुयात, असे ट्विट दिग्विजयसिंह यांनी केले आहे. तसेच, राजकीय पक्षांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतातही फुट पाडणाऱ्या शक्तींना हरवावे लागेल. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

बायडन जिंकले, ट्रम्प पराभूत
अमेरिकेत चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना 273, तर ट्रम्प यांना 214 मते पडली. बायडेन यांना 50.5 टक्के, तर ट्रम्प यांना 47.7 टक्के मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले आहे.