CM अरविंद केजरीवाल यांच्या नावावर आहे नको असलेलं ‘रेकॉर्ड’, जाणून घ्या राजधानी दिल्लीबाबतच्या ‘रोचक’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार देखील केला. मात्र, रात्री १०:३० वाजेपर्यंत ६१.४६ टक्के मतदान नोंदविण्यात आले. सायंकाळी ६ वाजेनंतर अधिकृत मतदान संपल्यानंतर पुन्हा एकदा एक्झिट पोलच्या निकालात आम आदमी पार्टी (AAP) संपूर्ण बहुमतासह दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. या विजयाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. तथापि, निवडणुकांच्या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीबाबत राजकीयदृष्ट्या काही अशा गोष्टी आहेत ज्या की अत्यंत रंजक आहेत.

जाणून घेऊया काही रंजक गोष्टी :
१. अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीत आतापर्यंत सात मुख्यमंत्री होऊन गेलेत. केजरीवाल यांनी यावेळी देखील अपेक्षा व्यक्त केली की दिल्लीत पुन्हा तिसऱ्यांदा त्यांचीच पार्टी बहुमताने सत्तेत येईल.

२. अरविद केजरीवाल यांच्या नावे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सर्वात कमी कालावधीचा विक्रम आहे. त्यांनी २०१४ मध्ये फक्त ४९ दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांचा कारभार सांभाळला होता. याआधी सुषमा स्वराज यांच्या नावे ५२ दिवसांचा मुख्यमंत्री पदाचा विक्रम होता.

३. दिल्ली वगळता सर्व केंद्र शासित प्रदेश लोकसभेच्या एका जागेचे प्रतिनिधित्व करतात, तर दिल्लीचे सात खासदार संसदेच्या खालच्या सभागृहात प्रतिनिधित्व करतात.

४. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट फक्त एकदाच लागू करण्यात आली आहे, जेव्हा १४ फेब्रुवारी २०१४ ला अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

५. दिल्लीमध्ये १ नोव्हेंबर १९५६ ते २ डिसेंबर १९९३ कुणीच मुख्यमंत्री नव्हते.

६. चौधरी ब्रह्म प्रकाश यांच्या नावे दिल्लीचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री असल्याचा विक्रम आहे. त्यांनी १९५२ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी शपथ घेतली. तसेच सर्वात वयस्कर मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित ह्या आहेत, त्यांनी वय वर्ष ६० असताना पदभार स्वीकारला होता.