मोदींकडून पंधरा लाख आले का पाहूया…चला बँकेत जाऊया !

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – गतनिवडणूक काळात प्रत्येकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारविरोधात काँग्रेसच्यावतीने बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. चला बँकेत जाऊ या, १५ लाख आले का पाहू या, या अभिनव आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सत्तेवर आल्यास प्रत्येकांच्या बँक खात्यावर १५-१५ लाख रुपये टाकण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर केंद्रात भाजप सत्तेवर आली व काही महिन्यातच प्रत्येकाला सरकारच्या वतीने जनधन योजनेचे बँक खाते काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारतीय नागरिकांनीही मोठ्या आशेने बँकेच्या रांगेत उभे राहत जनधन योजनेचे खाते काढले.

रंतु २०१९ उजाडले तरी अद्यापपर्यंत एकाही भारतीय नागरिकांच्या खात्यावर १५ लाख तर सोडा एक रुपयाही जमा झाला नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी चला बँकेत जाऊ या, १५ लाख आले का पाहू या, या अभिनव प्रकारचे आंदोलन काँग्रेसच्यावतीने ढाणकी येथील बँकेच्या समोर करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, माजी जि. प. सदस्य रामराव गायकवाड, प्रा. कैलास राठोड, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष इमरान पठाण, किसन वानखेडे, छबूराव धोपटे, संगीता कांबळे, भास्कर चंद्रे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शे. हमीद कुरेशी, सै. जाकीर सै. मुनीर, बाबूराव नरवाडे, राजू सावनकर, अजय देशमुख, सतीश राणे, जिल्हा महाससचिव यवतमाळ शे. अमीन शे. महमद, शे. एजाज, ओमाराव चंद्रे, शेख तालीब अहमद, मो. ताहेर शे. जमीर, वसंत फुलकोंडवार, रमेश गायकवाड, ॲड. शेख अन्सार आदी उपस्थित होते.