LIC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ‘एलआयसी’मध्ये होतोय मोठा बदल, सोमवारपासून लागू होणार नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमने (LIC) एक मोठा बदल केला आहे. एलआयसीच्या सर्व कार्यालयांना 5 दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 5 दिवस काम करावे लागणार आहे. उद्या सोमवार (दि. 10) पासून हा नियम लागू होणार असून कर्मचाऱ्यांना शनिवारी देखील आता साप्ताहीक सुटी दिली आहे. या निर्णयाचा देशातील जवळपास दीड लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

LIC ने एक अधिकृत नोटीस जारी करत या नियमाबाबत सूचना दिली आहे. नवीन नियमांनुसार उद्यापासून LIC ची सर्व कार्यालय सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी जारी केलेल्या सरकारच्या अधिसुचनेनुसार, एलआयसी शनिवारी देखील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. LIC कडून त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सुविधा देखील पुरवली जाते. तुम्ही https://licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर बहुतांश कामं पूर्ण करू शकता. याशिवाय LIC ने कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांची असुविधा लक्षात घेता क्लेम्सबाबत असणाऱ्या अटी शिथील केल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना वेतनवाढही मिळणार
LIC च्या कर्मचाऱ्यांना लवकरच वेतनवाढ दिली जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने वेतन संशोधन बिलला मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकामध्ये 16 टक्के वाढ नमुद केली आहे. तसेच एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष भत्ता देखील दिला जाणार असल्याचे नमूद केले आहे.