LIC चा पॉलिसीधारकांना दिलासा ! लाइफ सर्टिफिकेटसाठी सुरू केली ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये अनेक व्यवहार ठप्प आहेत. त्यामळे भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) पॉलिसीधारकांना दिलासा दिला आहे. अ‍ॅन्युटी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकांना हयात असल्याचे प्रमाणपत्र (लाइफ सर्टिफिकेट) ई-मेलच्या माध्यमातून सादर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पॉलिसी होल्डरना यासाठी LIC च्या कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने अ‍ॅन्युटी पॉलिसींसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अ‍ॅन्युटीज (कॅपिटल ऑप्शन) साठी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली आहे. तसेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून देखील लाईफ सर्टिफिकेट स्वीकारले जाणार आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेता LIC ने मृत्यू दाव्यातील नियमावली शिथिल केली आहे. मृत्यू दावे निकाली काढण्याची प्रक्रिया जलद केली आहे. ज्यात एखाद्या पॉलिसीधारकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर पालिकेचे मृत्यू प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्र LIC कडून स्वीकारले जात आहेत. पॉलिसीधारकाच्या नातेवाईकांना LIC च्या जवळच्या कोणत्याही शाखेत मृत्यू दाव्याची प्रक्रिया सुरु करता येणार आहे. तसेच त्याशिवाय मृत्यू दाव्याची रक्कम तातडीने वारसांना मिळावी यासाठी एनईएफटीचा वापर केला जात असल्याचे LIC ने म्हटले आहे.