काय सांगता ! होय, मृत्यूच्या 10 तासानंतर जिवंत झाली 83 वर्षीय महिला, दुसरीकडं चालु होती अंत्यसंस्काराची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युक्रेनमध्ये एका ८३ वर्षीय महिलेस डॉक्टर आणि पोलिसांनी मृत घोषित केले होते, परंतु १० तासानंतर पुन्हा ती महिला जिवंत झाली. स्टीरजावका शहरातील रहिवासी जीनिया दिदुख या एक निवृत्त परिचारिका असून त्या गेल्या रविवारी स्टेज ३ कोमात गेल्या होत्या. कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरीच उपचारासाठी बोलावले होते. डॉक्टर जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की जिनिया यांची प्रकृती खूपच गंभीर आहे आणि त्यांना जर रुग्णालयात नेले तर प्रकृती अधिक खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी घरीच आराम करू देण्याचा सल्ला दिला.

डॉक्टर निघून गेल्यानंतर जीनिया यांनी श्वास घ्यायचे बंद केले. यावेळी कुटुंबीयांनी डॉक्टरांसह पोलिसांनाही बोलावले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की आता जीनिया या जगात राहिलेल्या नसून त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले. त्यानंतर कुटुंबीयांनी कब्र खोदणाऱ्याबरोबर पाद्रीला देखील बोलावले होते.

डॉक्टर म्हणाले – ३७ वर्षांत अशी पहिली घटना पाहिली

जीनिया यांचे कुटुंबीय त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते तेव्हाच त्यांच्या मुलीला काहीतरी वेगळेच जाणवले. त्यांच्या मुलीने सांगितले की, जेव्हा सायंकाळी साडे सातच्या सुमारास मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तर ते गरम होते, म्हणजेच त्या जिवंत होत्या. यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर व्लादिमीर चेबोतारेव्ह म्हणाले की, ‘मी माझ्या ३७ वर्षांच्या कारकीर्दीत यापूर्वी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता.’ जेव्हा त्यांना रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्या स्टेज ३ कोमामध्ये होत्या, याचा अर्थ असा की त्या जिवंत असूनही, एखाद्या मृतदेहाप्रमाणे होत्या. आम्ही त्यांना निरीक्षणामध्ये ठेवले आणि एका आठवड्यात त्या कोमातून बाहेर आल्या.

जीनिया म्हणाल्या, मला स्वर्गात माझ्या वडिलांची भेट घ्यायची होती

जीनिया बऱ्या झाल्यावर त्यांनी कोमात असताना काय पाहिले असे विचारल्यास त्या म्हणाल्या की, ‘मी स्वर्ग पाहिला आणि तिथे गेल्यावर माझ्या वडिलांना आवाज दिला. मी त्यांना विचारणार होती की तिथे राहणे त्यांच्यासाठी सोपे राहिले का? मला ते तिथे असल्याचा भास होत होता आणि ते मला भेटतील असा विश्वास होता, परंतु जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्याभोवती पांढरे कपडे घातलेले लोक दिसले, ज्यांना पाहिल्यावर वाटले की ते देवदूत आहेत, परंतु ते डॉक्टर होते. मला असं वाटतं की माझ्यावर देवाची कृपा झाली आहे, त्यामुळे मला पुन्हा जीवनदान मिळाले.