काय सांगता ! होय, ‘मास्क’वर विषाणूचे आयुर्मान असते 8 दिवसांपर्यंत, काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी बहुतांश नागरिकांकडून मास्कचा वापर करण्यात येत आहे. मात्र, एका संशोधनानुसार संसर्गासाठी कारणीभूत ठरणारा विषाणू चेहर्‍याच्या मास्कवर एका आठवडयापर्यंत टिकून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर काही दिवसांपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे.

कोरोना विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. हा विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर चार दिवसांपर्यंत टिकून राहतो. चेहर्‍यावरील मास्कच्या बाहेरच्या स्तरावर कोरोना विषाणू एका आठवडयापर्यंत चिकटून राहू शकतो, असे वृत्त हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निग पोस्टने दिले आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबाबत जगभरात सुरू असलेल्या संशोधनात भर घालणारे हे संशोधन दि लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अहवालात नोंदविण्यात आलेली निरीक्षणे
* कोराना विषाणू अनुकूल वातावरणात मोठया प्रमाणावर स्थिर राहू शकतो, मात्र त्याला प्रमाणित जंतुनाशक पद्धतींचा धोकाही असतो’
* कोरोना विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या कागद व टिश्यू पेपरवर तो 3 तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसर्‍या दिवसापर्यंत नाहीसा झाला.
* काच आणि चलनी नोटावर तो दुसर्‍या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो 4 ते 7 दिवसांपर्यंत जिवंत होता.
* वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणार्‍या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू 7 दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले.
* सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.