जबरदस्तीने लग्न करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूच्या धाकावर पळवून जबरदस्तीने लग्न करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी हा निकाल दिला.

पंकज अंबादास देवतळे (३०) रा. मुबारकपूर ता. बाभूळगाव असे आरोपीचे नाव आहे. १४ जुलै २०१२ रोजी पीडित तरुणीला राळेगाव येथील ऑटो पाईटवरून आरोपीने जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून मुबारकपूर येथे नेले. तरुणीसोबत जबदरस्तीने लग्न करून अत्याचार करून घरात डांबून ठेवले होते. तरु णीने आपली सुटका करून आईसोबत राळेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून राळेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३६५, ३६६, ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक एन. पी. इंगळे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये तरुणी, आईची साक्ष नोंदविली. आरोपीने घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय अहवाल इत्यादी कागदपत्र मान्य केले. यामध्ये दोष सिद्ध झाल्याने आरोपी पंकज देवतळेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोन हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा देण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी वकील विजय तेलंग यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी उत्तम बावणे यांनी सहकार्य केले.