Coronavirus Lockdown : नियतीने भाकरी नव्हे, जगणचं हिरावलं ! ‘कोरोना’च्या भीतीनं जगणं झालं ‘भयावह’

पुणे : कोरोनामुळे घरामध्ये मरावे लागेल, या भीतीने मजूर वर्गाने पायपीट करीत गाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियतीच्या मनात भलतेच होते. औरंगाबाद-जालना लोहमार्गावर मालगाडीच्या धडकेत 16 जण चिरडले, तर एक गंभीर जखमी झाला. हे वृत्त समजताच हृदय पिळवटून गेले. बाप रे…. भाकरीसाठी शहराकडे आले आणि कोरोनाने भाकरी हिरावून घेतली. त्याच भाकरीच्या शोधात ते पुन्हा गावाकडे निघाले. मात्र, घरापर्यंत पोहोचण्याआधीच रेल्वेखाली ते चिरडल्याने मृतदेहाचे आणि भाकरीचे तुकडे विखुरले गेले. या मंडळींनी गाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियतीने त्यांचे जीवनच हिरावून घेतले.

लॉकडाऊन आणि पोलिसांच्या भीतीमुळे काही मंडळींनी चक्क रेल्वे लाइनमधून गावाकडे जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, शुक्रवारी (दि. 8 मे) रेल्वे लाइनने निघालेल्या मजुरांनी विसावा घेण्यासाठी डोके लाइनवरच टेकले. कोरोनामुळे भयभीत होऊन गावाकडे निघालेल्या मंडळींवर औरंगाबाद-जालना लोहमार्गावर काळाने झडप घातली आणि महाभयानक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कोरोनाच्या भीतीने बाहेर पडता येईना, रोजगार नाही, त्यामुळे घरात उपाशी राहण्याची वेळ आली होती. म्हणून ही मंडळी मजल दर मजल करत गावाकडे निघाली होती. मात्र, नियतीलाच हे मान्य नव्हते की काय, असा प्रश्न पडला आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे आल्यानंतरही गावाकडे जाण्याची ओढ काही औरच असते. दरवर्षी गावाकडे यात्रा, जत्रा, उत्सव, लग्नसमारंभ असे कार्यक्रम असतात, त्यामुळे वर्षभरातून एकदा तरी सुटी घेऊन गावाकडे कामगारवर्ग नव्हे, शहरवासिय जातात. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेऊन मनसोक्त गप्पा मारून. पुन्हा चार-दोन दिवसांनी शहराकडे धाव घेतात. मात्र, यावर्षी कोरोना नामक आजाराने सर्वांना जिथल्या तिथे लॉकडाऊन करून ठेवले आहे. त्यामुळे शहरातून गावाकडे आणि गावाकडून शहराकडे जाता येत नाही, अशी अवस्था झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे मागिल 46 दिवसांपासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यवसाय, उद्योग, कंपन्या बंद आहेत. काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संकल्पना राबविली आहे. मात्र, अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे उपासमारी होऊ लागली. बाहेर काम नाही आणि घरामध्ये किती दिवस बसून राहायचे. गावाकडे जायची इच्छा असूनही जाता येई ना अशी अवस्था झाली आहे. शहरामध्ये चौकाचौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

मागिल पावणेदोन महिन्यापासून घरात कंटाळलेल्या मजुरवर्गाने चोरट्या मार्गाने गावाकडे जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अवलंब केला. मात्र, पोलिसांचा ससेमिरा काही चुकला नाही. अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांना पकडले. देशभर लॉकडाऊन केले असले तरी पोट लॉकडाऊन करू शकत नाही, हे वास्तव असून कोणीही नाकारू शकत नाही. दोन वेळ कोणी तरी फक्त 50 ग्राम खिचडी भात देत आहे, त्याने पोट भरत नाही. त्याशिवाय साबण, तेल, कपडे धुणे, आंघोळ यासाठीचा खर्च आहे, तो कोठून करायचा असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

अनेक स्वयंसेवी संघटना आणि संस्था धान्य वितरित करत आहेत. तर काही समाजसेवकाचा बुरखा पांघरलेल्या मंडळींनी तयार जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम फक्त सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. आज मजुरांना जेवणाची गरज आहे, त्यांना मदत नव्हे, तर कर्तव्याच्या भावनेतून हात देण्याची खरी गरज आहे. मात्र समाजसेवेचा बुरखा पांघरलेली मंडळी फोटो काढण्यासाठी जेवण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्या मजुरांचे पोट भरत नाही, उलटपक्षी त्यांना खजिल करण्याचा प्रयत्न या मंडळींकडून केला जात आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, असे सांगण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब लाजीरवाणी आहे. अनेक स्वयंघोषित समाजसेवक तर म्हणतात काही शिल्लक असेल तर आता आम्हालाच द्या. बाप रे… हे समाजसेवक होते आणि कधी झाले होते, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. भुकेलेल्यांना मदत करता येत नसेल, तर त्यांना अपमानित तरी करू नका, असे सांगावेसे वाटत आहे.