Jalgaon News : महामार्गानं घेतला पोलिस दलातील विधी अधिकार्‍याचा जीव

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –   खराब रस्त्यामुळे वाहनाचा कट लागून पोलीस दलातील एका अधिका-याचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. जळगाव महामार्गावर बांभोरी पुलाजवळ बुधवारी (दि. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. दोनच दिवसापूर्वी याच महामार्गावर येवल्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान खराब रस्ते, समांतर रस्त्याचा अभाव यामुळे महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-37 रा. पाचोरा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. ते पोलीस दलात विधी अधिकारी होते. तर संदीप भीकन पाटील (35 रा.पोलीस लाईन) हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवारी पारोळा येथे होता. त्या कार्यक्रमासाठी गोसावी व पाटील हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनाने दुचाकीला कट मारला व त्यात दोघेही खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाचे टायर गोसावी यांच्या अंगावरुन गेल्याचे सांगितले जात आहे. यात संदीप पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपजारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.