14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला महत्वाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचं संकट आणखी गहिरं होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज जनतेशी संवाद साधून जनतेला दिलासा देत आहेत. राज्यात 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. या दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ जारी करत जनतेशी संवाद साधला.

जनतेला दिलासा देताना मुख्यमंत्री म्हणाले की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण लढणार आणि जिंकणार आहोत. माझा माझ्यापेक्षाही तुमच्यावर विश्वास आहे. माझे वडील बाळासाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, आज आत्मविश्वासाची गरज आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक इशारा देखील दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही घराबाहेर पडताना स्वच्छ रुमाल तोंडाला बांधून बाहेर पडा. भाजी मार्केट 24 तास खुली असतानाही गर्दी का होत आहे? कोरोना आपली परीक्षा बघतोय, त्याच्यासमोर गुडघे टेकता कामा नये. लढायला आम्ही मागे पुढे पाहात नाही. मात्र लोकांनीही शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपवायचं की नाही, हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे.

समाजकंठकांना इशारा देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही.

यावर माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मरकजवरुन राज्यात आलेल्या सर्वांचा शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात, त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत.