बीडमध्ये वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर, बीड जिल्ह्यात वादळी वारा , विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या दोंघांचाही मृत्यू वीज कोसळून झाला आहे.

केज तालुक्यातील तांबवा येथील तारामती बाळासाहेब चाटे (४०) या त्यांच्या सर्वे नंबर चार कुंभार शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी काम करत असताना पाऊस आल्याने त्या शेतातील कोट्याच्या दारासमोरील झाडाखाली थांबल्या. याच वेळी वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना धारूर तालुक्यातील दुनकवाड येथे घडली. वीज कोसळून संदीपान श्रीकृष्ण काळे (२०) यांचा मृत्यू झाला आहे. बावी तांडा येथेही वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकाडासह नागरिकांची पळापळ झाली. अंबाजोगई शहरासह परिसराच्या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह गाराचा पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पाऊसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. दरम्यान, या गारपीटीचा फटका शेतीला देखील बसला असून आंबा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.