बीड मध्ये DM विरुद्ध PM नव्हे तर PM विरुद्ध AP 

बीड: पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते. बीड मध्ये झालेल्या छोट्या छोट्या राजकीय हालचालींचे मोठे पडसाद श्रेष्ठीना सहन करावे लागतात. असे असताना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे. बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पुन्हा खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावावर शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिक्कामोर्तब केले. तर राष्ट्रवादी कडून जयदत्त क्षीरसागरांनी नकार दिल्याने अमरसिंह पंडित याची उमेदवारी निश्चित होऊ शकते, बीड लोकसभेसाठी या दोघांमध्ये थेट लढत होणार असल्याने सोशल मीडियावर दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
भाजपडून प्रीतम मुंडेंना उमेदवारी 
काल बीडमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंकजा मुंडे, खा डॉ प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी बाबत शंका घेण्याचे कारणच नाही असे म्हणत दानवे यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दिवंगत ओबीसी नेते गोपीनाथ मुंढे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून खा. प्रीतम मुंडे यांनी सहा लाख ९६ हजार ३२१ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. बीड लोकसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे त्यावेळी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे परिवारातील कोणी उमेदवार पोटनिवडणुकीत उभे राहिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही असे म्हटले होते. राष्ट्रवादीचा हा अप्रत्यक्ष पाठींबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मतदारांकडून मिळालेली सहानुभूती यामुळेच बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने साडेसहा लाख मतांची आघाडी घेतली होती.
विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात येण्या पूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या गैरहजेरीत कामकाज पाहत होत्या त्यामुळे त्यांना लोकांची कामे करून घेणे व समस्यांचे निरासरण करण्याचे कौशल्य आहे.खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत २९ वेळा चर्चेत वादविवाद मध्ये सहभाग दर्शविला असून ३४८ मतदारसंघाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत तर १ खासगी विधेयक देखील दाखल केले आहे
DM विरुद्ध PM  लढत नाहीच 
खरेतर बीड जिल्ह्यातून DM विरुद्ध PM  म्हणजेच धनंजय मुंडे विरुद्ध प्रीतम मुंढे यांची लढत होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र तसे काही घडलेच नाही. तिकडे मुबईत राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठकीत सर्व सरदारांनी जयदत्त क्षीरसागराच्या नावावर एकमत दाखवले मात्र जयदत्त क्षीरसागरांनीच लोकसभेसाठी नकार दिल्याने दुसऱ्या ओ बी सी चेहऱ्याचा शोध सुरू केला. ओ बी सी चेहऱ्याचा मेळ बसत नसल्याने गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या नावाची चर्चा झाली. पंडितांनी पवार साहेबांचा आदेश सरआखों पर म्हणत धनुष्य पेलण्याची तयारी दर्शवली. या राजकीय घडामोडीनंतर जिल्हाभरात सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली.