संतापजनक ! हुंड्यासाठी पतीनं चक्क वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकली ब्लेड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मोतिहार जिल्ह्यात एक घृणास्पद असा प्रकार समोर आला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून सुनेच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले. तसेच पीडित महिलेच्या खासगी भागातही ब्लेडने दुखापत करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपी पती मोहम्मद जब्बरक आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

सदरील महिलेचे गुलशन खातून असे नाव असून २३ जून रोजी तिचे लग्न झाले होते. तिचे वडील भाजी विक्रीचे काम करतात. घरी भाऊ आणि आई आहेत. गुलशनच्या लग्नासाठी वडिलांनी कर्ज घेऊन हुंडा दिला. तरीही अधिक हुंड्यासाठी तिला सासरच्या मंडळींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. त्यामुळे गुलशन माहेरी आली, त्यानंतर गुलशनचा नवरा आणि सासरा तिच्या माहेरी आला. तिथे ते दोघे एका खोलीत गुलशनशी बोलण्यासाठी म्हणून गेले आणि तेव्हा त्यांनी ब्लेडने तिच्या शरीरावर सपासप वार केले. तिच्या खासगी भागात (गुप्तांगात) ब्लेडचे दोन तुकडे आणि पाच मॅचस्टिक ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी जब्बरक रजाई गादी तयार करण्याचे काम करतो.

गुलशन खातून ने सांगितल्यानुसार, हुंड्यावरुन तिच्या सासरच्यांनी हे वेदनादायी कृत्य केले. यापूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी हुंडा म्हणून दीड लाख रुपये दिले होते. तरीसुद्धा आरोपी पतीने दुचाकीसाठी तगादा लावला होता. पीडित गुलशन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुजफ्फरपूर वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर कुटूंबीयांनी पोलिसांत गुन्हा नोंद केला. तात्काळ पोलिसांनी आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याच्या वडिलांना अटक केली असून त्यांना तुरुंगात पाठवले आहे.