Lockdown : केंद्र सरकार करतंय विचार ! 14 एप्रिलनंतरही काही ठिकाणी मर्यादित ‘लॉकडाऊन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून राबविलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन काही ठिकाणी मर्यादित राहण्याची शक्यता वर्तविली आहे. सर्वत्र लॉकडाऊन उठवण्याऐवजी जेथे कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत अशा ठिकाणी मर्यादित स्वरूपात लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा विचार सरकार करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. परिस्थितीचा आढावा घेताना मोदींनी काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या. लॉकडाऊन संपल्यानंतर नियोजनाबाबतीत त्यांनी काही महत्त्वपूर्ण सल्ले देखील दिले. सध्या देशात सुरू असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर रस्त्यावर गर्दी होणार नाही, याबद्दल रणनितीची गरज असल्याचे देखील मोदींनी स्पष्ट केले.

एका वृत्तपत्राला शुक्रवारी एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ज्या भागात कोरोना विषाणूची संख्या अधिक आहे किंवा विषाणूची वाढती भीती ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणांची यादी तयार करण्यात आली तर पुढील निर्णय घेणे हे अधिक सोपे जाईल. यासारख्या बऱ्याच जागा असू शकतात. उर्वरित क्षेत्राची चिंता नसल्याचे आम्हाला आढळल्यास तेथील लॉकडाऊन पूर्णपणे काढले जाऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाची भीती सतत आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन काही प्रमाणात मर्यादित केले जाऊ शकते. असे केल्याने अधिक धोका ज्या भागात आहे तेथे जास्त लक्ष देता येईल’, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

“प्रत्येक राज्याने १५ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच रस्त्यावर गर्दी होणार नाही याबाबत योजना आखली पाहिजे. लोक, वसाहती आणि क्षेत्रे टप्प्याटप्प्याने सुरु होतील याचे देखील नियोजन करावे असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ‘राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासूनच लॉकडाउन न संपवता ते टप्प्याटप्प्याने संपवावे याबाबतीत नियोजन केले पाहिजे. सर्व काही व्यवस्थित सुरू आहे असा विचार करून लोकांना रस्त्यावर उतरू देऊ नका’, अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत.