‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत नाव जोडल्याने ‘या’ नेत्याची बहीण पोलिसात 

हैदराबाद : वृत्तसंस्था – सोशल मीडियावरून प्रसिद्ध होणाऱ्या पोस्ट्स ह्या खऱ्या असतातच असे नाही. सोशल मीडियावरील पसरवलेल्या एका अफवेमुळे वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभाससोबत  शर्मिला यांचे नाव जोडल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र, या निव्वळ अफवा असून ऐन निवडणुका तोंडावर आल्या असताना या अफवा पसरवण्यामागे टीडीपीचा हात असल्याचा आरोपही वाय एस शर्मिला यांनी केला आहे.

याबाबत बोलताना शर्मिला म्हणाल्या, “आजपर्यंत मी कधीही प्रभासला भेटले नाही आणि कधी त्याच्याशी बोललेही नाही. “लोकसभा निवडणूक जवळ आहे. यासाठी मला राजकीय निशाणा बनवलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी माझ्याविरोधात अफवा पसरवून बदनामीचा प्रयत्न सुरु आहे. या अफवा पसरवण्यामागे टीडीपी आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असा दावा शर्मिला यांनी केला. त्याच्या तक्रारीनंतर हैदराबाद सायबर क्राईम सेलने गुन्ह्याची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे.
आयटी अॅक्टच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद
सायबर सेलचे अतिरिक्त आयुक्त केसीएस रघुवीर म्हणाले की, “आम्ही आयटी अॅक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये पसरलेल्या माहितीची चौकशी सुरु केली आहे. ज्या-ज्या लोकांनी ही माहिती अपलोड केली आहे, त्यांची चौकशी केली जाईल.”
“याआधी २०१४ च्या निवडणुकीआधीही माझ्या आणि प्रभासच्या संबंधांबाबत सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. पण निवडणुकीनंतर या अफवा शमल्या. आता लोकसभा निवडणुकीआधी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली जात आहे,” असं शर्मिला यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून वायएस शर्मिला आणि प्रभास यांच्या संबंधांबाबत सोशल मीडियावर चर्चा आहे. शर्मिलाचे आणि प्रभासचे अनेक फोटो आणि माहिती व्हायरल होत असून या दोघांमध्ये काही ना काही नातं असल्याचा उल्लेख त्यात आहे. पण या अफवा असल्याचे शर्मिला यांनी सांगितल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे.