बापरे ! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण, अन्…

अमरेली/गुजरात : वृत्तसंस्था – एखादा जंगली प्राणी दिसला तरी आपण घाबरुन जातो. विचार करा जर कोणाच्या छातीवर वाघ, सिंहासारखा हिंस्त्र प्राणी येऊन बसला तर त्या व्यक्तीची काय अवस्था होईल. या गोष्टीची कल्पना जरी केली तरी आपल्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. मग प्रत्यक्षात जर आपल्यासोबत असे झाले तर मोठा ॲटॅकच यायचा. असाच एक प्रकार गुजरातमधील अमरेलीमध्ये घडला आहे.

अमरेली जिल्ह्यातील विपुल खेलैया याने दावा केला आहे की, तो आपल्या झोपडीमध्ये झोपला होता. तेव्हा त्याच्या छातीवर एक भुकेलेली सिंहीण येऊन बसली. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार विपुर सावरकुंडला तालुक्यातील अभारमपारा गावचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की, तो रात्री झोपला असताना अचानक एक सिंहीण त्याच्या छातीवर येऊन बसली. हे पाहताच त्याला आपला मृत्यु समोर दिसला. मात्र लगेचच मनावर ताबा मिळवत धाडस केले. पूर्ण मानसिक आणि शारिरीक ताकद लावून त्या सिंहीणीला हाताने जोरदार धक्का दिला.

त्याने सांगितले की, हा आघात सिंहीणीला नवा होता. अचानक एखादा प्राणी निपचित पडून राहून प्रतिहल्ला करतो आणि दूर ढकलतो, हे पाहून सिंहीणीला धक्का बसला व जंगलात पळून गेली. सिंहीणीला समजले की, तो तिचा शिकार नाही, असे खेलैयाने सांगितले. त्याने पुढे सांगितले की, ज्यावेळी सिंहीण माझ्या छातीवर येऊन बसली त्यावेळी मला अचानक मोठे वजन पडल्यासारखे वाटले. मी डोळे उघडून पाहीले तेव्हा माझ्या छातीवर सिंहीण बसली होती. तिच्या डोळ्यात जेव्हा मी पाहिले तेव्हा मला माझा मृत्यु समोर दिसत होता, असे खेलैयाने सांगितले.