१० हजार रुपयांची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बिगरशेती (NA) परवान्याची नोंद करून घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणारा तहसील कार्य़ालयातील वरिष्ठ लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र, कारवाई दरम्यान लिपीकाने तेथून पलायन केले. तर खासगी इसमाला पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे तहसील कार्य़ालयात खळबळ उडाली आहे.

कैलास भिका कंखरे असे फरार झालेल्या अव्वल कारकूनाचे नाव आहे. तर चंद्रसिंग भरतसिंग पवार (वय-४५ रा. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांची थाळनेर शिवारात वडलोपार्जीत जमीन आहे. या जमिनीपैकी ०.५३ आर जमिन बिगरशेती (NA) करण्याची परवानगी मिळाली होती. मिळालेला परवान्याचा आदेश नोंदवून अहवाल थाळनेर तलाठ्यांकडे पाठवण्यासाठी कैलास कंखरे याने खासगी इसमामार्फत १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता कैलास कंखरे याने खासगी इसमामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला होता. मात्र, सापळा रचल्याचे माहित होताच कैलास कंखरे याने तेथून पलायन केले. पथकाने खासगी इसमाला पैसे घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –