पोलिस स्टेशनमध्येच चोरी झाल्यानं ‘खळबळ’

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांच्या मौल्यवान वस्तू आणि त्यांच्या जिवाची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यवर असते. मात्र, नागरिकांची सुरक्षा करण्याची अपेक्षा असणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्यातील मुद्देमालावर हात साफ केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यातीलच मुद्देमाल सुरक्षीत नसले तर नागरिकांच्या मालमत्तेचे काय असा प्रश्न जणमाणसातून उपस्थित होत आहे.

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या स्टेशनरुममधून दारुच्या बाटल्यांची चोरी केली. अकोला ते नांदेड या वर्दळीच्या रस्त्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये 24 तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरु असते. असे असताना देखील चोरट्यांनी दारुच्या बाटल्या चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या दारुच्या बाटल्या हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या. यामध्ये देशी आणि विदेशी दारुच्या बाटल्या होत्या.

चोरट्याने पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मुद्देमाल ठेवण्यात येणाऱ्या खोलीच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आणि वाकवून मुद्दमाल कक्षात प्रवेश केला. हा प्रकार बुधवारी (दि.16) सायंकाळी सहा ते शुक्रवार (दि.18) सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. चोरट्यांनी मुद्देमाल कक्षात प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीचे 26 देशी दारुचे बॉक्स आणि 14 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या 64 बाटल्या लांबवल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्यातच चोरी झाल्याची लाजिरवाणी घटना घडल्यानंतर पोलिसांनी याची कमालीची गुप्तता पाळली होती. याप्रकरणात दोषी अधिकारी आणि कर्माचाऱ्यावर काय कारवाई करण्यात येणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.