‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये ‘ओली’ पार्टी

वैराग/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय. सोलापूर शहरात सर्वाधिक रुग्ण असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यातील सांगोला, मोहोळ, अकलूज, अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये एक किराणा दुकानार कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून वैराग परिसरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. अशी चिंताजनक परिस्थिती असताना शासकीय अधिकारी मात्र चक्क मद्य पार्टी करताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.

मागील काही दिवसापासून गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वैराग मधील ग्रामस्थ चिंतेत आहेत. तर दुसरीकडे वैराग ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, कार्यालय अधीक्षक, पाणीपुरवठा अभियंता व मुख्य लिपीक मात्र दारूच्या नशेत धूंद आहेत. या अधिकाऱ्यांनी गाव बंद असल्याचा फायदा घेत चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच दारू रिचवली अन्‌ आपल्या बेजबाबदारपणाचा कळस केला. यावर आता कोणती कारवाई होणार याकडे वैरागकरांचे लक्ष लागले आहे. हा प्रकाराचा पर्दाफाश ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वैरागमध्ये एका किराणा व्यापाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कात असणाऱ्यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी असताना वैराग ग्रामपंचायत कार्यालयात एक दारुची पार्टी रंगली आणि लागलीच त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने बार्शी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे वैराग पूर्ण सील असताना ग्रामपंचायत कार्यालयत पार्टी रंगते कशी, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

एकीकडे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन रात्रंदिवस राबत आहे आणि स्थानिक वैराग ग्रामपंचायत प्रशासनातील वैरागचे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम व पाणीपुरवठा अभियंता रामभाऊ जाधव, लिपिक अमजद शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत असल्याचे समोर आले आहे. तसेच या पार्टीचा व्हीडिओ आणि फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले.

पोलीस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच अधिकाऱ्यांना दारू, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा, असे सांगून गेले. हे सर्व खोट ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारू कशी मिळते, कार्यालयात दारू कोठून येते, पार्ट्या ऑफीसमध्येच कशा होतात, या लोकांना दारूचा पुरवठा कोण करते अशा अनेक सवाल उपस्थित होत असून स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील या निमिताने प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. या असंवेदनशील प्रकारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.