Coronavirus Lockdown : नगरमध्ये अ‍ॅम्ब्युलन्समधून दारूची विक्री, तिघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापने बंद आहेत. लॉकडाऊन दरम्यान दारूची तस्करी वाढली असून पोलिसांकडून यावर कारवाई करण्यात येत आहे. नगरमध्ये चक्क अ‍ॅम्ब्युलन्समधून दारूची वाहतूक करताना तिघांना पकडण्यात आले.

शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्समधून दारू जप्त करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु असून दारुची दुकाने बंद आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने दारुची विक्री सुर असल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधून दारूची वाहतूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अ‍ॅम्ब्युलन्सवर कारवाई करत तिघांना अटक केली असून दारू आणि अ‍ॅम्ब्युलन्स जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी रुग्णालयाच्या परिसरात एक दुचाकीस्वार दारुचे बॉक्स नेत असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके यांना मिळाली. त्यानुसार, साळुंके आणि पथकानं दुचाकीला अडवून दारुचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्समधून दारू पुरवली जात असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅम्ब्युलन्सची झडती घेतली असता त्यामध्ये एक दारूचा बॉक्स सापडला. पोलिसांनी अ‍ॅम्ब्युलन्स आणि दारू जप्त करून चालकाला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेली अ‍ॅम्ब्युलन्स खासगी असल्याचे समजतेय.