दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारु तस्करी करताना NCP चा नगरसेवक गजाआड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिपक जैस्वाल असे या नगरसेवकाचे नाव असून तो चंद्रपूर नगर परिषदेचा माजी अध्यक्ष आहे. जैस्वाल याच्यासह दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाने बापट नगर येथे कारवाई केली आहे. बापट नगर येथील जैस्वाल याच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली. झडतीमध्ये 35 पेटी देशी आणि 15 पेटी विदेशी दारू जप्त करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवकाला पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची मोठी बदनामी झाली आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जैस्वाल विरोधात कोणती करावाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जैस्वाल याच्या घरापुढे असलेल्या कारमध्ये देशी-विदेशी दारुच्या पेट्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करून साडपाच लाख रुपयांची दारू जप्त केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला अटक झाल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. काही समाजिक संघटनांनी जैस्वाल याला तडीपार करण्याची मागणी केली आहे.

You might also like