पुणे : ‘या’ ठिकाणीही मिळणार दारू, वेळेतही केला बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घेण्यात आले. पुण्यात देखील लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात तळीरामांना मद्य मिळावे यासाठी शहरातील वाईन शॉप अटी आणि शर्तीनुसार खुली करण्यात आली. मात्र, आता रेस्टॉरंट-परमिट रुममध्येही वाईन शॉपच्या दरात मद्य उपलब्ध होणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, मद्याचे पार्सल ग्राहकांना घरी घेऊन जावे लागणार आहे. एवढेच नाही तर मद्य विक्रीची वेळ देखील एका तासाने वाढवण्यात आली आहे.

रेस्टॉरंट आणि बार चालकांना त्यांच्या हॉटेलमध्ये मद्याचा साठा पाच टक्के व्हॅट आकारून विक्री करण्यासाठी सरकारने काही काळासाठी परवानगी दिली होती. परंतु आता त्यांना नवा माल खरेदी करून वाईन शॉपच्या दरात (एमआरपीनुसार) विक्री करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्यातील पुणे विभागाचे आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली. राज्यातील रेस्टॉरंट-परमिट रुम गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे त्यांनीही मद्यविक्रीला परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. रेस्टॉरंट आणि बार बंदच राहणार आहेत. फक्त त्यांना पार्सल स्वरुपात मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले की, कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यावेळी त्यांच्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 ही वेळ निश्चित करण्यात आली होती. आता त्यामध्ये एका तासाने वाढ केली आहे. त्यामुळे सायंकाळी सहाऐवजी ती सात वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. अनेक शासकीय, खासगी कार्यालये आणि कंपनी काम करणाऱ्यांची कामाची वेळ सायंकाळी सहा पर्यंत आहे. त्यामुळे त्यांना मद्य खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी वाईन शॉप चालकांनी केली होती. त्यानुसार एक तास वेळ वाढवून देण्यात आला असल्याचे झगडे यांनी सांगितले.