भाजपला अनेकांनी आतापर्यंत केला ‘रामराम’ पण काहींनाच झालाय ‘फायदा’ !

पोलीसनामा ऑनलाईनः भाजपमध्ये पक्षातील विशिष्ट नेत्याबद्दल नाराजी व्यक्त करून बाहेर पडणे हे केवळ आजचे नाही तर ते पूर्वीपासूनच चालत आले आहे. भाजपची (Bjp-foundation ) स्थापना झाल्यापासून म्हणजेच 1980 पासून अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण पक्षांतर केलेल्यांना नव्या पक्षात मोठे पद वा यश मिळाल्याची उदाहरणे फार कमी आहेत. जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.या पार्श्वभूमीवर आजवरच्या काही प्रमुख भाजप नेत्यांच्या पक्षांतराचा पट समोर आला आहे. कुरघोडीचे राजकारण, पक्षांतर्गत गटबाजी, काही नेत्यांना डावलले जाणे यावर ब-याचवेळा पक्षात धूसफूस झाली. पण बंडाचे निशाण हाती घेत पक्षातून बाहेर पडणा-यांची संख्या कमीच राहिली.

1995 ला युती सरकारच्या काळात ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री राहिलेले,पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकराज्य हा पक्ष स्थापन केला. पण तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. पुढे डांगे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नेमले होते. मात्र त्यांना आमदारकी वा मंत्रीपद मिळू शकले नाही.
त्यानंतर नगरसेवक ते खासदार असा प्रवास करणारे पुण्यातील निष्ठावंत नेते अण्णा जोशी हे भाजपने लोकसभेला तिकीट नाकारल्याने नाराज होऊन राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतर्फे त्यांनी कोथरुड मतदार संघातून विधानसभेची निवडणूल लढली. पण त्यात ते पराभूत झाले.

बीडचे खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण पुढे दोघात टोकाचे मतभेद झाले आणि गायकवाड यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण काही वर्षांनी मुंडेच्या हाकेला प्रतिसाद देत ते भाजपात परतले.

भाजपच्या आमदार राहिलेल्या विमल मुंदडा राष्ट्रवादीत गेल्या आणि मंत्री झाल्या. आता त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा याच मतदार संघात भाजपच्या आमदार आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे सख्ये पुतणे धनंजय मुंडे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. आज ते मंत्री आहेत. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दिग्गज नेत्यांच्या वादात मुंडे बंडाचे निशाण फडकावितात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण लालकृष्ण अडवाणी यांच्यासह त्याकाळच्या दिग्गज नेत्यांनी हे वादळ शमवले.

विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रा. महादेव शिवणकर हे एकेकाळी पक्षात मोठे नाव होते. मात्र पुढे ते पक्षात डावलले गेले. त्यांचे पुत्र विजय हे राष्ट्रवादीत गेले. त्यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीकडून तिरोडा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण ते पराभूत झाले. महादेव शिवणकर हे राजकारणात आता पूर्वीसारखे सक्रीय नाहीत. भाजपचे आमदार, खासदार राहिलेले भंडारा जिल्ह्यातील नेते ड़ॉ. खुशाल बोपचे यांनीही पक्ष सोडला होता. ते राष्ट्रवादीत गेले आणि पुन्हा परतून भाजपचे आमदार झाले. पुढे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रविकांत यांचा (राष्ट्रवादी) तिरोडा मतदारसंघात पराभव झाला.

आरएसएची स्थापना ज्या नागपूर शहरात झाली. त्या शहरात भाजपचा पहिला आमदार निवडून येण्यासाठी 1990 पर्यंत वाट पहावी लागली. पहिले आमदार होते विनोद गुडधे-पाटील.ते 1995 मध्ये जिंकले. पण पुढे त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. ते कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांचे पुत्र प्रफुल्ल हे काॉंग्रेसकडून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस बोट धरून गुडधे पाटील राजकारणात आले होते. प्रफुल्ल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. संघ, जनसंघ, भाजप असा प्रवास केलेले मुंबईतील निष्ठावंत नेते मधू देवळेकर यांचीही भाजपाने हकालपट्टी केली होती. भाजपमध्येही कॉंग्रेस प्रमाणेच गटबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. युती सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले डॉ. दौलतराव आहेर हे पुढे राष्ट्रवादीत गेले. पण पुन्हा भाजपात परतले. आज त्यांचे पुत्र राहुल हे चांदवडचे भाजप आमदार आहेत.