चक्क हिंदू, महाराष्ट्र नावाचेही मतदार !

नगर मतदारसंघातील यादीत घोळ : अनेकांची नावे दोन मतदारसंघात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीत अनेक गावांत घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. चक्क ‘हिंदू’, ‘महाराष्ट्र महाराष्ट्र’ अशी नावेही मतदार यादीत आढळून आली आहेत. अनेक बनावट नावे मतदार यादीत आल्याने प्रशासनही गोंधळात पडले आहेत. बनावट नावे मतदार यादीत असली, तरी ओळखपत्राशिवाय कुणालाही मतदान करता येणार नसल्याने त्या नावांचा फायदा होणार नाही, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील मतदारयादीत सदर नावे वगळण्यात येईल, असे सांगण्यात आले.

राहुरी, अहमदनगर, पारनेर अशा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत ही नावे आढळून आली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी या संकेतस्थळावर नगरमधील एका केंद्रावर मतदारांची नावे शोधताना हा प्रकार आढळून आला. एकच नाव दोन-दोन लोकसभा मतदारसंघात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम घरबसल्या ऑनलाईनद्वारे करण्याची सोय आहे. तसेच ग्रामीण भागात मतदार नोंदणीची कामे आऊटसोर्सिंगद्वारे केली जातात. त्यामुळे हा मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बनावट नावे व दोन मतदारसंघात मतदारांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

राजकीय फायद्यासाठी काही राजकीय कार्यकर्त्यांनीच असा घोळ केला असावा, असा संशय आहे. दोन ठिकाणी काही मतदारांची नावे आल्याने प्रशासन याला कसा लगाम घालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
You might also like